शिकारीमुळे वाघ विलुप्त होण्याच्या मार्गावर?
सिंहाप्रमाणेच वाघ सुद्धा जंगलातील एक महत्त्वाचा प्राणी म्हणून गणला जातो. वाघाचा थाट काही जंगलाच्या राजापेक्षा कमी नाही. वाघाचे बलाढ्य, बळकट शरीर, त्याची डरकाळी, त्याचा धावण्याचा वेग, त्याचा चालण्याचा रुबाब बघून कोणीही त्याला जंगलाच्या राजापेक्षा कमी लेखणार नाहीत. परंतु आज याच वाघाची शिकार होत आहे, आणि त्यामुळेच वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.
त्यातच सध्या गोव्यामधील म्हादई अभयारण्यातील चार वाघांच्या मृत्यूची धक्कादायक माहितीमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. प्राणीप्रेमींमध्ये या माहितीमुळे असंतोष दिसून येत आहे.
वर्षभरात वाघासोबतच बिबळ्यांच्या मृत्यूचे आकडे सुद्धा पुढे आले आहेत. 'वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेच्या संशोधनानुसार वर्षभरात १०० हून अधिक वाघांचा गेल्या वर्षभरात मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक वाघांचा शिकारीमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याप्रमाणेच वाघांबरोबरच देशाच्या विविध जंगलांमध्ये ४९१ बिबट्यांचाही मृत्यू झाला आहे. व्याघ्र संवर्धनासाठी वन विभाग अतिशय सक्रिय असून सुद्धा १०० पेक्षा अधिक वाघांचा मृत्यू झाला याबाबत नक्कीच आश्चर्य वाटले पाहिजे.
विविध व्यवसायामध्ये वाघांचे अवयव वापरले जातात. त्यामुळे वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. वाघनखें, दात, कातडी यांचा विविध व्यवसायात उपयोग केला जातो, म्हणून वाघांची बेकायदेशीररित्या शिकार करून त्याच्या अवयवांची तस्करी केली जाते. वाघांच्या मृत्यूचे शिकार हे एक कारण असून याप्रमाणेच भांडणात झालेला मृत्यू, रास्ता ओलांडताना अपघात होऊन मृत्यू नैसर्गिक मृत्यू ही सुद्धा वेगवेगळी कारणे आहेत.
जंगलात वर्चस्व आणि हद्द प्रस्थापित करण्यासाठी वाघांमध्ये सध्या होत असलेली भांडणे त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत आहेत. राज्यात दर वर्षी होत असलेल्या वाघांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये हद्दीचा वाद हा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. गेल्या पाच वर्षांत ७५हून अधिक वाघांचा मृत्यू एकमेकांमधील भांडणातून झाला आहे आले आहे. प्रत्येक वाघ हा स्वतःची हद्द राखून राहणारा प्राणी आहे. त्यांच्या हद्दीत इतर वाघांना प्रवेश मिळत नाही. एखाद्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्यांच्यामध्ये मारामारी होऊन ताकदवान वाघ त्या हद्दीचा मालक बनतो. ही नैसर्गिक क्रिया असून, यापूर्वीही सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये हद्दीच्या भांडणातून वाघांचे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
नैसर्गिक कारणे सोडली तर व्याघ्र संवर्धनासाठी व वाघांची शिकार रोखण्यासाठी वन्य विभाग जिकरीने प्रयत्न करत आहे. व्याघ्र संवर्धनासाठी विविध योजना सुद्धा राबविण्यात येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात वाघांची शिकार कमी होईल ही आशा नक्कीच ठेऊ शकतो.
Comments
Post a Comment