संवर्धन चित्त्याचे..
जंगल सफारी, प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव अभयारण्ये ही प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना घेऊन जावे असे हॉटस्पॉट ठरत आहेत. लहानपणी कल्पनारम्य कथांमध्ये ऐकताना तसेच प्राण्यांविषयी शिकताना त्या प्राण्यांना डोळ्यासमोर बघण्याची अनेकांची इच्छा असते. पण विचार करा, आपण लहानपणापासून वाचत आलेले, बघत आलेले किंवा शिकत आलेले हे प्राणी गायब होऊ लागले किंवा विलुप्त झाले तर काय होईल? वास्तविक पाहता, जंगलातील बरेच प्राणी भयानक दराने नष्ट होत आहेत आणि त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न जोरात चालू आहेत. त्यातच जगातील सर्वात वेगवान प्राणी चित्त्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि ही खरंच काळजी करण्याची बाब आहे.
चित्ता हा मार्जार जातीतील एक प्राणी असून तो हलका व सगळ्यात वेगवान प्राणी मानला जातो. तो अधिकतर आफ्रिका आणि इराणमध्ये आढळून येतो. कोरडे गवत किंवा जंगलातील झुडुपे हे त्याचे निवासस्थान असते. मनुष्य आणि प्राण्यांमधील संघर्ष हे त्यांच्या नामशेष होण्याचे प्रमुख कारण आहे. सध्या जंगलात सुमारे 7,100 चित्ते शिल्लक आहेत. पूर्वीच्या काळात बेकायदेशीर शिकार करणे आणि व्यापारासाठी बेकायदेशीर पाळीव प्राण्यांना विकणे हे प्राण्यांच्या नष्ट होण्यामागील महत्त्वपूर्ण कारण होते. मानवानेही राहण्यासाठी, घरे बांधण्यासाठी प्राण्यांच्या निवासस्थानात घुसखोरी केली आहे. जागतिकीकरणासाठी मानवाने त्यांचे जंगल आणि त्यांना वावरण्यासाठी असणाऱ्या मोठ्या जागा हिरावून घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जंगल आणि त्यांची प्रजाती टिकवण्यासाठी सामूहिक आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सरकारने काही वर्षांपूर्वी क्लोनिंगचा पर्याय पुढे ठेवला होता. ते इराणमधून एशियाटिक चित्ते आयात करण्याच्या प्रक्रियेत होते. तसेच, भारतीय प्रदेशात चित्तांची संभाव्य पुनर्निर्मिती हा एक पर्याय होता. त्यांनी चित्यांच्या पुनर्निर्मितीसाठी राजस्थानमधील नौरादेही वन्यजीव अभयारण्य, मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर वन्यजीव अभयारण्य आणि राजस्थानच्या जैसलमेरमधील शाहगड बल्ग लँडस्केप यासारख्या संभाव्य जागा निवडल्या. सरकारने चित्ता वाचविण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी, प्राणी वाचविण्यासाठी युद्धपातळीवर ते साकारले जाणे, त्याचे योग्य अवलंबन करने आवश्यक आहे. जोपर्यंत आपण पर्यावरणशास्त्राचे जतन करीत नाही तोपर्यंत चित्ता किंवा त्याच्यासारख्याच इतर जंगली प्राण्यांचे जतन केले जाणार नाही. आणि जर त्यांचे जतन केले जाणार नाही तर विलुप्त झालेले हे प्राणी बालपणातील कथांमध्ये सुद्धा दिसणार नाहीत...
Comments
Post a Comment