जंगलातील पावसाळी सफर !
पावसाळा चालू झाला की अनेकांना पावसाळी सहलीचे वेध लागतात. ट्रेकिंगला किंवा चांगल्या देखाव्याच्या ठिकाणी जायला सर्वांनाच आवडते.. परंतु कोणी पावसाळ्यात जंगलाची सफर करण्याचा विचार केला आहे का? नसेल केला तर नक्कीच करावा.. 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह' हा पावसाळ्यात जंगलाची सफर किंवा सफारी करण्याचा एक उत्तम पर्याय आहे.
पावसाळ्यात 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह' हे पर्यटकांसाठी बंद असते अशा अनेक अफवा आहेत. परंतु खरे बघितल्यास पावसाळा हा जंगलातील सर्व प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी विलक्षण सक्रिय काळ असतो. त्यामुळे खरे सांगायचे झाल्यास पावसाळ्यात हे संपूर्ण रिझर्व्ह सुरु असते, परंतु केवळ २० जीप ना आत जाण्याची परवानगी असते. पावसाळा सुरु झाल्यावर जूनमध्ये येथे जवळपास १,२०० मि.मी. चा पाऊस पडतो आणि आर्द्रता जवळपास ६० टक्के असते. पावसाळ्यामुळे रिझर्व्ह हे नवे जीवन मिळाल्यासारखे अतुलनीय सुंदर दिसायला लागते, संपूर्ण झाडांना पालवी फुटते व संपूर्ण जंगलामध्ये हिरवळ पसरू लागते. तसेच या काळात शाकाहारी प्राण्यांसाठी खाद्याची निर्मिती सुद्धा जंगलात होत असते.
याप्रमाणेच पावसाळ्यात ताडोबामध्ये अजून बदल घडून येतात. ते म्हणजे जंगलातील तलाव व तळी पाण्याने भरून जातात आणि त्यामुळे प्राणी तहानलेले राहत नाहीत. त्यांना या पाण्यात पोहताना, खेळताना व जलक्रीडा करताना बघण्यासाठीचा हा अतिशय उत्तम असा ऋतू आहे. पावसाळ्यात नव्या झाडांना पालवी फुटल्यामुळे अनेक शाकाहारी प्राण्यांना ज्याप्रमाणे अन्न मिळते त्याप्रमाणेच हा ऋतू त्यांच्या प्रजानानासाठीही उत्तम असतो. परंतु अशा काळात ताडोबामधील वाघांसोबतच इतर छोटे-मोठे मांसाहारी प्राणी देखील अशा शाकाहारी प्राण्यांच्या मागावर असतात.
जोरदार पावसामुळे जंगलातील बराचसा भाग पाण्याखाली जाऊ लागतो, तेव्हा सर्व प्राणी उंचवट्यावरील, पावसापासून संरक्षण करणाऱ्या किंवा लवकर सुकणाऱ्या जागा शोधू लागतात आणि संरक्षणाच्या हेतूने तिकडे जातात. अशा वेळी तुम्हाला जंगल सफारीमधून हरणे, रानटी डुक्कर, कुरंग हरीण यांसारख्या प्रजननासाठी तयार होणाऱ्या अनेक प्राण्यांना बघता येईल. त्याचप्रमाणे लावे, तितर, घुबड, रॅप्टर, जंगली पोपट, बार्बेट असे काही लोकप्रिय प्रजातीचे पक्षी सुद्धा दिसू शकतात. पावसाळ्यातील सफारी दरम्यान नीलगाय, गौर, जंगली कुत्रे, सांभर आणि जर तुम्ही खूपच लकी असाल तर मग तुम्हाला वाघ सुद्धा दिसू शकतो.
पावसाळ्यात जंगल सफारीला जाण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. सर्वात पहिले तर पावसाळ्यात सफारीला जाताना आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घ्यावी. जंगलात सफारीला निघताना संपूर्ण शरीर झाकलेले कपडे घालावे, सोबतच रेनकोट किंवा विंडशिटर सोबत ठेवावे. मच्छर- कीटक यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी क्रीम, अँटिसेप्टिक क्रिम, सॅनिटायझर, प्रथमोपचार पेटी सोबत ठेवावी. मोबाईल, कॅमेरा यांसारखे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स सोबत असल्यास त्यांचा पावसापासून बचाव करण्यासाठी योग्य काळजी घ्यावी.
ताडोबा जंगल सफारीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी 'झरना जंगल लॉज' वेबसाईटला फॉलो करा.
Comments
Post a Comment