ताडोबा टायगर रिझर्व्हमधील एक उन्हाळी सफारी
उन्हाळा हा ऋतू सहलींचा नाही पण नक्कीच जंगल सफारीचा असू शकतो. उन्हाळा हा अनेकांसाठी अगदी सुस्त, कंटाळवाणा आणि उकाड्याचा हंगाम आहे; तर वन्यजीव प्रेमी याच हंगामात अधिक वेळ जंगल सफरीमध्ये घालवतात. भारतात आज अनेक नॅशनल पार्क आणि अभयारण्ये आहेत जे देशातील अनेक प्राण्यांचा सांभाळ करत आहेत. यापैकी अनेक अभयारण्ये 'प्रोजेक्ट टायगर' किंवा 'प्रोजेक्ट लायन' या कार्यक्रमांतर्गत भारत सरकारद्वारे चालविली जातात. वन्यजीवांचे रक्षण करणे आणि येथे जास्तीत जास्त पर्यटन वाढवणे हा यामागील उद्देश आहे.
उन्हाळ्यात उष्णेतेमुळे जंगलातील पाण्याचे स्रोत कमी होऊन जेथे पाणी उपलब्ध असेल अशा ठिकाणी वन्य प्राण्यांना तहान भागवण्यास यावे लागते आणि यामुळे उन्हाळा जंगल सफारीसाठी अतिशय योग्य हंगाम आहे. या उपलब्ध असणाऱ्या कमी पाण्याच्या स्रोतांजवळ अनेकदा वन्यप्राणी दिसण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सफारीसाठी गेल्यावर अशा वन्यप्राण्यांचे निरीक्षण करता येते. काही रुक्ष आणि कोरड्या वनस्पतींमुळे सुद्धा जंगलात अनेकदा प्राण्यांची एक झलक बघायला मिळू शकते.
वन्यजीव प्रेमींसाठी उन्हाळ्यात 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह' हे एक तृष्णा भागवणारी जागा असू शकते. नॅशनल पार्क आणि वन्यजीव अभयारण्याचे एकत्रीकरण करून निर्माण केलेले 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह' हे अधिकाऱ्यांच्या उत्तम देखरेखीखाली आहे.
सुमारे १७२७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले हे रिझर्व्ह विविध पक्षी व वन्यजीवांचे निवासस्थान आहे. वन्यजीव प्रेमींना ताडोबाजवळ राहण्यासाठी अनेक आरामदायक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे 'झरना जंगल लॉज' हे नक्कीच आहे.
सफारीसाठी स्वतःला व्यवस्थित तयार करण्याची गरज असते. त्या क्षेत्रासाठी तुम्ही नवीन असता, तुम्हाला तिकडची कसलीही माहिती आणि कल्पना नसते, त्यामुळे सर्वप्रथम गाईड (मार्गदर्शक) विचारणे सोयीचे ठरते. तसेच सफारीला निघताना पुरेसे पाणी, पॅक केलेले अन्न, हार्ड कॅश, दूरबीन आणि फ्लॅशलाइट सुद्धा सोबत घ्यावे.
कपडे साधारण टी-शर्ट, कार्गो पॅंट आणि जॅकेटसारखे असावे. कपड्यांचा रंग हिरवा, तपकिरी, शेवाळी किंवा खाकी असावा जेणेकरून जंगलातील वातावरणाशी ते मेळ खातील. जंगलातील काही झाडांमुळे अथवा कीटकांमुळे होणारी ऍलर्जी, वातावरणातील बदल यासर्वांपासुन रक्षण करण्यासाठी शरीर पूर्णपणे झाकलेले असावे.
सफारीला जाताना कॅमेरा, मोबाईल फोन (फोटोसाठी) असे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स यांसोबतच सनस्क्रिन लोशन, स्कार्फ, अँटिसेप्टिक क्रिम, सॅनिटायझर, प्रथमोपचार पेटी सोबत ठेवावे. अशी संपूर्ण तयारी करून गेल्यास तुम्ही सफारीचा अधिक आनंद घेऊ शकाल आणि ही तुमच्या आठवणीतील सफारी होऊ शकेल.
Comments
Post a Comment